Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तापी-पूर्णा संगमावर रंगला मुक्ताबाई-चांगदेव भेटीचा सोहळा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाशिवरात्री पर्वावर चांगदेव-मुक्ताई भेट सोहळ्याचे लाखो भाविक साक्षीदार ठरले.

श्री संत मुक्ताबाई आणि योगिराज चांगदेव महाराज वारीत चौथ्या दिवशी पहाटेपासून तापी-पूर्णा नद्यांच्या संगमावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी चांगदेवाला मंत्रोपचार अभिषेक केला. यावेळी यामिनी चंद्रकांत पाटील, तहसीलदार शाम वाडकर, छोटू भोई, सरपंच संजीवनी पाटील, मंदिराचे पुजारी विष्णू महाराज यांची उपस्थिती होती. नवीन मुक्ताई मंदिरावर पूजा व अभिषेक शांताराम पाटील सोमथना यांनी केला. तसेच कोथळीतील जुने मुक्ताई मंदिरात कोथळीचे उपसरपंच उमेश राणे यांनी सपत्नीक महापूजा केली. आई मुक्ताई पादूकांना तापी-पूर्णा संगमावर स्नान घालून मंदिरात आणण्यात आल्या. योगिराज चांगदेवास गुरू संत मुक्ताईतर्फे शाल, श्रीफळ देवून पूजन करून आरती केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुक्ताईनगर येथील मंदिरात सकाळी ८.३० वाजता संत मुक्ताईचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानतर्फे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. मंदिराचे व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज, विनोद सोनवणे, विनायकराव हरणे, ज्ञानेश्‍वर हरणे, धनंजय सापधरे, कल्याण पाटील व वारकरी, कीर्तनकार व भाविक उपस्थित होते.

१८ फेब्रुवारी दशमीपासून ते महाशिवरात्री चार दिवसांत लाखो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, शनिवारी २२ रोजी सकाळी १० वाजता कोथळी मंदिरात विश्‍वंभर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महा प्रसादाने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

Exit mobile version