Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर महासभेत सर्वांची पोलखोल करेल : कैलास सोनवणे यांचा इशारा (Video)

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेऊन बदनामी करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास महासभेत सर्वांची पोलखोल करेल, यासाठी आपल्याकडे भरपूर पुरावे असल्याचा दावा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, मलिदा खाण्यासाठीच भाजपने वॉटर ग्रेस कंपनीला साफसफाईचा ठेका दिल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते महाजन यांनी गुरुवारी केला होता. त्या आरोपांना भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. विरोधी पक्षनेते महाजन हे भाजपवर बिनबुडाचे आरोप करीत असून राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले. ठेक्यात पार्टनरशिप असेल तर आरोप न करता थेट नावे जाहीर करा, असे आव्हान दिले.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत नगरसेवक कैलास सोनवणे यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, पालिकेने आता पर्यायी व्यवस्था राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून साफसफाईच्या कामाला सुरुवात होत आहे. दहा ते बारा दिवसांनी शहरातील परिस्थिती बदलली असेल. दर पाच दिवसांनी संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे; परंतु आजच रस्त्यासाठी आंदोलन का होतेय, आत्ताच ठेकेदार कामबंद का करतो हे लवकरच स्पष्ट होईल. बरेच लोक अडचणी निर्माण करीत आहेत. परंतु माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेऊन बदनामी करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास महासभेत सर्वांची पोलखोल करेल, माझ्याकडे देखील भरपूर पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, नवनाथ दारकुंडे, अ‍ॅड. दिलीप पोकळे, किशोर बावीस्कर आदी उपस्थित होते.

Video :

Exit mobile version