Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर फडणवीसांच्या हातात सत्ता द्या

 

सातारा : वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आऱक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर त्यांचं काम पुढं न्यावं. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन, असं आव्हान उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

उदयनराजे म्हणाले, “निवडणुका येतात त्यात तु्म्ही नुसती आश्वासनं देता आणि फक्त दुसऱ्यांना नावं ठेवता. थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. जातीचं राजकारण करायचं असेल तर घरी बसा. प्रश्नांवर राजकारण करणार आहात की नाही. आज तुम्ही देवेंद्र फडणवीस जे आपल्याच पिढीतले आहेत त्यांनी मराठा आऱक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर तुम्ही सत्तेत आला तर त्यांचं काम पुढे न्या. उलट तुम्ही काहीतरी कारण सांगून अजूनही प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.”

“कोरोनाचा काळ आहे म्हणून लोक घरात शांत आहेत. मराठा समाजावर अन्याय होत गेला आणि तुम्ही त्यांना दाबत गेलात तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होईल. क्रियेला प्रतिक्रिया होऊ शकते. याला कोण थांबवणार? जर उद्रेक झालाच तर त्याला जबाबदार कोण आहे? कशाचंही नुकसान झालं तर त्याला हीच लोक जबाबदार असतील”, अशा शब्दांत उदयनराजेंनी सरकारला इशारा दिला.

दोन तप गेले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तरीही हे लोक म्हणत असतील की आम्ही मराठा समाजाचे कैवारी आहोत. मराठा स्ट्राँग मॅन आहोत तर ही उपमा कितपत लागू होते. तुम्ही मोठे लोक आहात तुमच्याकडे समाजाने इतर काहीही मागणं मागितलेलं नाही. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेऊन तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही मोठे आहात. कोण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. पण तुम्ही एक लक्षात घ्या की ज्यांनी तुम्हाला मान दिला त्यांचा जर विश्वासघात झाला तर हीच लोकं तुम्हाला पुन्हा खाली खेचतील, असा इशाराही यावेळी उदयनराजेंनी सत्तेतील सर्व मराठा नेत्यांना दिला आहे.

Exit mobile version