Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय पूर्णपणे अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेणार : ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरु असलेल्या कोरोना संशयित रुग्ण शोध मोहिमेत आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या लक्षात आल्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील संपूर्ण खाटा या कोविड रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

 

येथील नियोजन भवनात जळगाव जिल्हा कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध, उपचार व उपाययोजनांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, खासदार उन्मेश पाटील, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, जिल्ह्यात सध्या संशयित रुगण शोध मोहिम सुरु आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. येत्या पंधरवड्यात जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास त्यांचेवर तातडीने उपचार करण्यासाठी येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयातील सर्व खाटा या अधिग्रहीत करण्यात येऊन बाधित रुग्णांवर उपचार करावे लागतील. तर या कालावधीत नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होवू नये याकरीता त्यांचेवर उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय हे नॉन कोविड रुग्णालय म्हणून घोषित करावे लागेल. लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांचे जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यास प्राधान्य आहे. याकरीता येथील कोविड रुग्णालयात 300 बेड ऑक्सिजनयुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या 40 बेड आयसीयुचे तयार आहे, 60 खाटांचे ऑक्सिजन बेडचे काम सुरु आहे. 180 ऑक्सिजन पाईपलाईनचे बेड तयार होत आहे. जिल्ह्यातील अनेक आमदारांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्या आहे. या निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्याठिकाणी 50 ऑक्सीजनयुक्त बेड तयार करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर अनेक नागरीक कोविड सेंटर अथवा सामाजिक विलगीकरणाच्या ठिकाणी येण्यास घाबरतात. अशा नागरीकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास रुग्णांच्या खर्चाने खाजगी हॉटेलमध्ये राहून त्यांचेवर उपचार करण्याचे नियोजन असून त्यासाठी हॉटेल निश्चित करण्यात येणार आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त नागरीक तपासणी करुन घेण्यास पुढे येतील. त्याशिवाय आरोग्य यंत्रणेतील अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवूनही फारसा प्रतिसाद न लाभल्याने पदे रिक्त आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी दर मंगळवारी भरती प्रक्रिया राबविण्यात येऊन पदे भरण्यात येतील. तसेच आमदार निधीतून सुचविलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी यंत्रणेला केल्यात. तसेच नागरीकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.

 

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती देतांना ट्रेसिंग, टेस्टींग, आणि ट्रिटमेंट या थ्री टी चा वापर करुन संशयित रुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत असून टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील. परंतु लवकर निदान, लवकर उपचार यामुळे जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील. जेणेकरुन जिल्ह्याचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. सध्या जिल्ह्याचा मृत्युदर हा 8.4 % वरुन 6.8% आला आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वॅब तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याबरोबरच खाजगी प्रयोगशाळेकडेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तपासण्या होऊन कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. जिल्ह्यातील 225 पैकी 170 मृत्यु हे 50 वर्षावरील व्यक्तींचे झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची तपासणी घरोघरी जाऊन करण्यात येत आहे.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी जिल्ह्यात सध्या 3403 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 1913 रुग्ण बरे झाल्याची माहिती दिली. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 16 दिवसांवर गेला असून जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन 684 असल्याची व बेड व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रामानंद यांनी कोरोनाचा कोणत्याही रुगणांस व्हेटीलेटरची आवश्यकता भासू नये याकरीता प्रयत्न सुरु असून जुलै अखेर जिल्ह्यात 68 व्हेटीलेटर उपलब्ध राहतील यासोबतच महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची व साधनसामुग्रीची माहिती दिली.

 

महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जळगाव शहरात सध्या 670 रुग्ण आहे. त्यापैकी 292 रुग्ण बरे झाले असून 37 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 351 रुगण उपचार घेत आहे. यापैकी 11 रुग्ण गंभीर असल्याचे माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार उन्मेश पाटील, माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींना महत्वपूर्ण सुचना केल्यात. तसेच प्रत्येक आमदाराने त्यांच्या तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये करावयाच्या उपाययोजना, आवश्यक साधनसामुग्री, रुग्णांच्या अडीअडचणी मांडतानाचा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनासोबत असून याकरीता सर्वातोपरी मदत करतील असेही सांगितले.

 

या बैठकीस आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल, संजय सावकारे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे यांच्यासह जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंसिडंन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचलन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी केले.

Exit mobile version