Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर इतर पर्यायांचा वापर करावालागेल–अमेरिकेचा चीनला इशारा

 

 

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून चीनने वाचवलं आहे. चीनने वीटोचा वापर केल्यानं मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यानंतर आता अमेरिकेनंही चीनला कडक शब्दांत इशारा दिला आहे. चीनच्या अशा धोरणानं संयुक्त राष्ट्रातील इतर सदस्य देशांना इतर पर्यायांचा वापर करावा लागेल. जर चीन दहशतवादासंदर्भात गंभीर असेल, तर त्यानं पाकिस्तान आणि इतर देशांतील दहशतवाद्यांचा बचाव करू नये. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यानं सांगितलं की, चीननं चौथ्यांदा असं केलं आहे. चीननं सुरक्षा परिषदेच्या प्रक्रियेत अडचणी आणणं योग्य नाही. चीन असाच वारंवार दहशतवादावर कारवाई करण्यापासून इतर देशांना रोखत राहिल्यास सुरक्षा परिषदेकडे इतर मार्गांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

 

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र चीनने नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे. पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. मात्र चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते.

Exit mobile version