Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डोहात पाय घसरून पडल्याने आमोदा येथील वृध्दाचा बुडून मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा येथील ६५ वर्षीय वयोवृद्धाचा पाय घसरून गिरणा नदीच्या डोहात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उत्तम रामसिंग सूर्यवंशी (वय-६५)रा. आमोदा बु ता. जिल्हा जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम रामसिंग सूर्यवंशी (वय-६५)रा. आमोदा बु ता. जिल्हा जळगाव हे आपल्या कुटुंबियांचं वास्तव्याला होते. शेती व गुरे चारण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता उत्तम सूर्यवंशी हे गुरे चारण्यासाठी घराबाहेर गेले. त्यांच्याच शेताच्या बाजूला असलेला गिरणा नदीपात्रातील गमऱ्या डोहात गुरे चारत असतांना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात बुडाले. दरम्यान दोन दिवसानंतर शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या घटनास्थळी धाव घेतली. याबाबत जळगाव तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सायकर करीत आहे.

Exit mobile version