यावल, प्रातिनिधी। तालुक्यातील डोंगर कठोरा येथील हिरामण विठ्ठल कोलते व गोपाळ डिगंबर सरोदे यांच्या गावातील भरवस्तीत खळ्याला अचानक आग लागली. या आगीत हिरामण कोलते यांच्या शेती उपयोगी सामानाचे खूप नुकसान झाले असुन.दुपारी साधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास आग लागली.
डोंगर कठोरा येथील खळ्याला आग लागली परंतु, आजूबाजूला घरी कोणी नसल्यामुळे आग लवकर लक्षात आली नाही. परंतु, ज्या वेळी आग लागली असे लक्षात आले त्यावेळी गावातील स्वामीनारायण मंदिरातील भोंगा तीन वेळा वाजवण्यात आला. गावात कुठेही आग लागली तर गावातील मंदिरातील भोंगा तीन वेळा वाजविला जातो. त्यामुळे तात्काळ गावातील लोक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा होऊन त्यांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत त्यातील सामान हे जळून खाक झाले होते. यामुळे हिरामण कोलते यांच्या शेती उपयोगी सामान यात ठिबकच्या नळ्या, पाईप, पत्रे यांचे आगीमुळे खूप नुकसान झाले. तसेच गोपाळ सरोदे यांच्या खळ्यातील काही सामान जळाले आहे. गावातील लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला कारण ही आग भरवस्तीत लागली होती. आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी ग्राम विस्तार अधिकारी सी.जी. पवार,तलाठी कुंदन जाधव, ग्रा.पं.कर्मचारी प्रदीप पाटील, कलेश कोल्हे आदींनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे असे सांगितले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.