Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बोहरी यांनी योग्य मार्गदर्शन करीत ऐन दिवाळीत वाचवले गरिबाचे प्राण

 

एरंडोल, प्रतिनिधी । येथील डॉ. फरहाज बोहरी यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर एरंडोल येथील एका गरीब कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाच्या विझणाऱ्या दिव्याला योग्य निदान व योग्य सल्ला दिला व एका गरीब घरातील दिवा पेटता ठेवला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल येथील रहिवाशी व बाजारात झाडू व टोपली विकून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे अरुण दगडु नेटके यांना दि.११ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन रक्त वाहिन्या ९० टक्के बंद झालेल्या होत्या. प्रसंगी नेटके यांच्या जीविताला देखील मोठा धोका होता. या आजारात नेटके यांना खाजगी दवाखान्यात लाखो रुपये लागतील हे डॉ.बोहरी यांना कळले. रुग्ण नेटके यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी वेळीच प्रथमोपचार केले. तसेच अरुण नेटके यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेत धुळे येथील डॉ. सुराणा यांच्याकडे जाऊन त्वरित उपचार घेण्याचा सल्ला दिला. यामुळे फक्त तीन दिवसात नेटके भर दिवाळीच्या दिवशी सुखरुप घरी परत आले. यासाठी नेटके परिवारातील सदस्य सुभाष नेटके, संजय नेटके व स्वतः रुग्ण अरुण नेटके यांनी डॉ. फरहाज बोहरी यांना भेटून जीवनदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन आभार मानले.
आरोग्यदुत विक्की खोकरे यांचे अनमोल सहकार्य. शहरातील रुग्णांची सेवा करणारे आरोग्यदुत विक्की खोकरे यांनी यावेळी खुप मोलाचे सहकार्य केले. त्यांनी एरंडोल येथूनच अरुण नेटके यांचे सर्व रिपोर्ट करवून घेतले व महात्मा फुले आरोग्य योजनेत सदर शस्त्रक्रिया होण्यासाठी लागणाऱ्या बाबीं बद्दल तत्काळ माहिती देऊन त्यांची स्वतः पूर्तता करुन सर्वात महत्वाचे कार्य केले. तसेच धुळे येथील डॉ. सुराणा यांच्या सोबत भ्रमणध्वनीवरुन बोलुन योग्य ती माहिती घेऊन नेटके परिवारातील सदस्यांना योग्य मार्गदर्शन केले. याप्रसंगी विक्की खोकरे यांनी सुद्धा अरुण नेटके यांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यास मदत केल्याबद्दल नेटके परिवारातील सदस्यांनी त्यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार मानले.

Exit mobile version