Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बाबासाहेबांचे विचार हे प्रत्यक्ष कृतीत आणून, समाज उत्थानाचे काम करावे – पालकमंत्री

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचत असून ते अधिक प्रभावीपणे पोहोचावे  व डॉ.बाबासाहेबांचे विचार जनसामान्यात रुजवण्यासाठी जिल्हाभरात ५५ कोटी निधीच्या १३८ संविधान भवन बांधण्यात येणार असून मागासवर्गीयांच्या विकासासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही. “पुस्तक हे मस्तकात आले पाहिजे, बाबासाहेबांचे विचार हे प्रत्यक्ष कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे”   असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.  ते सामाजिक न्याय व व विशेष सहाय विभागाच्या विविध उपक्रम कार्यक्रम प्रसंगी  बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी व्याख्याते  डॉ.वासुदेव मुलाटे हे होते.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत राज्यभरात “सामाजिक न्याय पर्व २०२३” विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हा नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे  आयोजन सहायक आयुक्त  योगेश पाटील यांनी केले होते.  यावेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजी नगरचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ.वासुदेव मुलाटे उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, समाजकल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील, तृतीयपंथी कल्याण मंडळ सदस्य शामिभा पाटील , समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.राकेश चौधरी , सचिन पवार, रविंद्र चव्हाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची विनोद ढगे व सहकाऱ्यांनी म्हटलेल्या महाराष्ट्र गीताने करण्यात आली. तर यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, जळगावच्या वतीने सदर चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाची पाहणी  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

 

यावेळी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.वासुदेव मुलाटे यांनी कुठलेही महापुरुष कोणत्याही जाती धर्माचे नसतात तर ते एकाच जातीचे असतात ते म्हणजे माणूस असे मत व्यक्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य समाजामध्ये निर्माण केले. तसेच भाषा हृदयाचा श्रुंगार असतो असे प्रतिपादन केले. अश्या प्रकारे वक्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देत नीतिमान समाज निर्मितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली. तर यावेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी मनोगत करतांना समाजकल्याण विभाग करीत असलेल्या उपक्रमांचे व कामांचे  कौतुक करून  अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासित केले.

 

यावेळी योगेश पाटील सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजकल्याण विभाग राबवीत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत तळागाळापर्यंत योजना पोहोचवीत असल्याचे स्पष केले.तसेच सामाजिक न्याय पर्वानिमित्त महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहचवून समाज कल्याण विभागाचे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासठी राबविण्यात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक लेखाधिकारी मनीषा पाटील  यांनी तर आभार कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे, यांनी मांडले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी कर्मचारी व  कार्यालयीन तालुका समन्वयक महेंद्र पाटील, जितेंद्र धनगर, चेतन चौधरी, किशोर माळी,  अनिल पगारे व सर्व कार्यालयीन सहाय्यक यांनी विशेष प्रयत्न केले.

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

वर्षभरात समाजकल्याण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेतील विजेत्यांना व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधत विंविध उपक्रम राबविण्यात आले.  यात विविध योजनांचे बक्षीस वाटप, स्वाधार शिष्यवृत्ती चे वाटप, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शिष्यवृत्ती, जाती प्रमाणपत्र वाटप, कन्यादान योजना तसेच कला व क्रिडा क्षेत्रांतील स्पर्धा प्रमाणपत्र वाटप जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते वाटप करून गुण – गौरव करण्यात आला.

Exit mobile version