Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. प्रशांत सोनवणे हे राज्यस्तरीय गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अध्यापन व संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत सोनवणे यांना राज्यस्तरीय गुरूगौरव पुरस्कार २०२२ या पुरस्काराने नुकतेच धुळे येथे सन्मानित करण्यात आले.

 

समाजशास्त्र विभागात गेल्या बारा वर्षापासून अध्यापनाचे काम करीत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांत सोनवणे यांना रियल ग्लोबल व्हीजन सोशल डेव्हलपमेंट पुरस्कार फाउंडेशन धुळे या मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय गुरूगौरव पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील , एस एस वी पी एस संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय तुकाराम पाटील , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मनोहर तुकाराम पाटील, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य प्रमोद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. सोनवणे यांना आयसीएसएसआर, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून दोन प्रमुख संशोधन प्रकल्प, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या मार्फत एक संशोधन प्रकल्प व वीसीआरएमएस या स्कीम अंतर्गत संशोधन प्रकल्प असे एकूण चार संशोधन प्रकल्प मिळाले आहेत. तसेच योग प्रमाणीकरण मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत घेतली जाणारी अतिउच्च योगाचार्य ही परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत. या माध्यमातून ते योगाही शिकवत आहेत. त्यांच्या या अध्यापन, संशोधन सामाजिक व आरोग्यविषयक केल्या गेलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version