Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी सांगितल्या सोनाली सिंहिणीच्या आठवणी

भुसावळ प्रतिनिधी । दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील सोनाली या पाठाचे लेखक डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनी पाठात उल्लेख केलेल्या त्यांच्या नातीने म्हणजेच डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी आपल्या आजोबांसह सोनाली या सिंहिणीच्या आठवणी सांगून आपले अनुभव कथन केले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्रात डॉ. पूर्णपात्रे बोलत होत्या. प्रारंभी मराठी साहित्याचे अभ्यासक आनंदा पाटील म्हणाले की, लेखक-कवींशी प्रत्यक्ष बोलण्याचा आणि त्यांना ऐकण्याचा हा उपक्रम विद्यार्थी व शिक्षकांची एक प्रकारे मशागत करणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाचा त्यांना निश्‍चितच लाभ होईल, असेही ते म्हणाले. बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी डॉ. पूर्णपात्रे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. दीपाली पूर्णपात्रे म्हणाल्या की, आजोबा वा. ग. पूर्णपात्रे यांनी लिहिलेल्या सोनाली पुस्तकात वन्यप्राण्यांचे अनुभव सांगितले आहेत. हे अनुभव सत्यकथेवर आधारित असून माणसातील पशुत्व व वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्या या अनुषंगाने हा संवेदनशील पाठ प्रेरणादायी म्हणून आणि माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश मिळावा म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकात घेण्यात आला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पाठात रूपाली नावाची कुत्री आणि सोनाली नावाची सिंहिण यांच्यात रमणारी दीपाली त्यावेळी लहान होती. परंतु जेव्हा रूपालीला पुण्याला सोडल्यानंतर तिने जेवण सोडले असे माहिती पडल्यावर आम्ही सर्व पुणे येथील पेशवे उद्यानात तिला भेटायला गेलो. तेव्हा आजोबांची व्यथा आणि व्यथित झालेली सोनाली सिंहिण यांचा अनुभव आजही आठवतो. अशा आठवणी डॉ. दीपाली पूर्णपात्रे यांनी कथन केल्या. ऑनलाईन संवाद सत्रास बालभारती मराठी विषय समिती सदस्य डॉ. माधुरी जोशी, अभ्यास मंडळ सदस्य सौ. स्मिता जोशी यांच्यासह महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version