Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयास पल्स ऑक्सीमीटर भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्‍त इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयास एकूण १९२ पल्स ऑक्सीमीटर भेट देण्यात आले.

 

याप्रसंगी रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन विनोद बियाणी, उपाध्यक्ष गनी मेमन, डॉ.राजेश सुरळकर, पीआरओ उज्ज्वला वर्मा यांच्यासह डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, मेडिसीन विभागप्रमुख डॉ.चंद्रेय्या कांते, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड हे उपस्थीत होते. मान्यवरांचे स्वागत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी केले. मान्यवरांच्याहस्ते रेडक्रॉसतर्फे रुग्णालयातील डॉक्टरांना पल्स ऑक्सीमीटर भेट दिले. ज्याद्वारे रुग्णांचे पल्स घेेणे सोयीचे होईल. एकूण १९२ पल्स ऑक्सीमीटर देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष विनोद बियाणी यांनी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्य व त्याचे महत्व विशद केले. यात रेडक्रॉस दवाखाना, रेडक्र्रॉस मेडिसीन बँक, रेडक्रॉस ऑक्सीजन बँक अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालय व परिसर हा जळगाव जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब असे सांगून गौरवोद्गार काढले. कोविड रुग्ण व जनरल वैद्यकीय सेवा अशा दोन्ही रुग्णांना स्वतंत्ररित्या येथे उपचार करण्यात आले. शाळा ते महाविद्यालय, जीवनदान ते देहदान अशा सर्वच वैद्यकीय सेवा येथे दिल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

यानंतर उपाध्यक्ष गनी मेमन यांनी उपस्थीत डॉक्टरांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जीवनात पैसाच सर्वस्व नाही, माणूसकी असेल तरच तुम्ही खर्‍या अर्थाने एक चांगल जीवन जगत आहात. तुम्ही घातलेले पांढरे अ‍ॅप्रन आणि स्टेटसस्कोप हे तुमच्यासमोर प्रत्येकालाच नतमस्तक व्हायला लावते कारण ईश्वरासमानच डॉक्टर्स असतात. जीवनदान देणारे तुम्ही आहात आणि धन्य तुमचे आई-वडिल आहेत. याशिवाय तुम्ही वावरत असलेल्या परिसरातील स्वच्छता कर्मचारी असो वा क्‍लरिकल स्टाफसह डॉक्टर्स असो सर्वांचाच तुमच्या मोठे होण्यात वाटा आहे. त्यामुळे त्यांना नेहमीच प्रार्थनेत आठवण ठेवा आणि सर्वांशीच माणूसकीने वागा कारण तुम्ही एक डॉक्टर आहात आणि ही बाब खुप मोठी असल्याचेही मेमन म्हणाले. यानंतर पल्स ऑक्सीमीटरचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version