Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव – प्रत्येकाने आयुष्याला दिशा द्यायची असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचलेच पाहिजे असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंती दिनानिमीत्त डॉ.केतकी हॉल येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे चेअरमन तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. एन. एस. आर्वीकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मोसमी लेंढे यांच्यासह प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे  प्रा.डॉ.बापुराव बिटे  प्राध्यापक पियुष वाघ, प्रा.विशाखा वाघ, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.विठ्ठल शिंदे यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारा व्हिडीओ दाखविण्यात आला. तसेच विद्यार्थी आदित्य निर्वळ, ओमप्रकाश मुटकुळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाष्य व कविता सादर केली.

याप्रसंगी प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक ज्ञान व शेतकर्‍यांविषयीची भुमिका विशद केली. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शोधायच असेल तर त्यानी संविधान लिहिलेय, आयुष्याची परिक्षा उत्तीर्ण व्हायची असेल तर एकदा तरी संविधान वाचा. एमबीबीएसची डिग्री घेऊन केवळ वैद्यकीय क्षेत्रात गुरगुरता येईल पण संपुर्ण जगात गुरगुरायचे असेल तर संविधान अवश्य वाचले पाहिजे असेही ते म्हणाले.  यानंतर अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्वीकर म्हणाले की, सुभेदार रामजी आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. बाबासाहेबांना लहान पणापासुन कबीराचे दोहे शिकविले. बाबासाहेबांनी समाजाची सेवा केली. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी दिला. बाबासाहेबांनी २ वर्ष १० महिन्यात राज्य घटना लिहिली. संविधानामुळेच आपण आहोत, असे डॉ.आर्विकर यांनी सांगितले. यावेळी प्रा.बापूराव बिटे व डॉ.विठ्ठल शिंदे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डॉ.उल्हास पाटील यांना भेट म्हणून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.बापुराव बिटे व डॉ.विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आदित्य निर्वळ, प्रशिक वानखेडे, शुभम जोगदंड, योगेश त्रिवेदी, ओमप्रकाश मुटकुळे, प्रणव वावरे, उत्कर्ष भोसले आदिंनी परिश्रम घेतले.

 

डॉ.बाबासाहेबांमुळे सामाजिक विषमता दूर – डॉ.उल्हास पाटील

ज्यावेळेस भारतीय घटना प्रस्तावित करण्यात आली त्यावेळी प्रत्येक आर्टिकलवर संसदेत चर्चासत्र झाले. बाबासाहेबांनी आपल्याला काय अधिकार दिले ते प्रत्येक नागरिकाने जाणुन घेणे गरजेचे आहे. आम्हि सगळे भारतीय. आम्हाला असा देश हवा ज्यात स्वातंत्र्य आहे धर्मनिरपेक्षता आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय विषमता नष्ट करण्यासाठी घटनेत तरतुद केली. शिक्षणाचा अधिकार सर्वाना मिळाला पाहिजे. ते नसते तर शिक्षणातहि विषमता दिसली असती. देशातील विषमता दुर करण्याचा त्यांचा ध्यास होता. भारत देशाला बदलवायच हे त्यानी ठरविले होते. आपले मौलिक अधिकार काय यासाठी देशाची घटना तुम्हाला माहिती पाहिजे. घटनेमुळेच सर्वसामान्यांना मताचा अधिकार या महामानवाने प्राप्त करुन दिला.डॉ. बाबासाहेब नसते तर सामाजिक विषमता दुर झाली नसती. म्हणुनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे  क्रांतीसुर्य आहे. त्यांनी सामाजिक विषमता दुर केली. आयुष्यात यशस्वी व्हायाचे असेल तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणावे, असा सल्‍लाही डॉ.उल्हास पाटील यांनी दिला.

Exit mobile version