Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. आंबेडकरांनी सामाजिक परंपरा नाकारून समाजाची जडणघडण केली – ज. वि. पवार

भुसावळ प्रतिनिधी । बाबासाहेबांनी सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली असल्याचे दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “तू झालास मूक समाजाचा नायक” या कवितेचे कवी ज.वि.पवार यांनी सांगितले. झूम ॲपद्वारे दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील ऑनलाईन संवाद सत्र जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू आहे. त्यात दलित साहित्य चळवळीतील लेखक पवार यांनी संवाद साधला.

ऑनलाईन संवाद सत्रात दलित साहित्यावर चर्चा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांती केली. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बाबासाहेबांना अभिवादन म्हणून “आज पन्नास वर्षांनी” ही कविता लिहिली. प्रारंभी वंदना भिरूड यांनी परिचय करून दिला. समतेचे महाकाव्य या दहा हजार कवितांचा समावेश असलेल्या काव्यसंग्रहाचे संपादन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कवी ज. वि. पवार यांनी केले असल्याचे बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. श्री पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याची आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देत दलित साहित्य चळवळीविषयी सविस्तर माहिती दिली. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक परंपरा नाकारणारा होता. बाबासाहेबांना नवा समाज घडवायचा होता. सामाजिक विषमता दूर करून समता प्रस्थापित करायची होती. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल “आज पन्नास वर्षांनी” ही कविता लिहिली. “तू झालास मूक समाजाचा नायक” या नावाने ही कविता आधी नववी आणि आता दहावीला आहे. बाबासाहेबांचे कर्तृत्व या कवितेतून वर्णन केले असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन व नियोजन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार प्रकाश जोशी यांनी मानले. ऑनलाईन संवाद सत्रात नेहमीप्रमाणे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version