Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव प्रतिनिधी | कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झालेल्या विवाहितेचा वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, गिरीश माधवराव पाटील रा. किनगाव ता. यावल हे टेलरिंगचे काम करतात. पत्नी सुनिता गिरीश पाटील (वय 32) व दोन मुले भूमिका आणि कुणाल असा परिवार आहे. गिरीश पाटील यांनी कुटुंब नियोजनासाठी पत्नी सुनीता पाटील यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 23 नोव्हेंबर 2019 रोजी दाखल केले. ऑपरेशन देखील त्याच दिवशी झाले. दरम्यान ७ दिवसांनंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. याबाबत त्यांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे पत्नीला ३० नोव्हेंबर रोजी दाखल केले. दरम्यान शस्त्रक्रिया हे व्यवस्थित न झाल्यामुळे जखम भरली नाही व त्याठिकाणी जखम वाढत गेली. दरम्यान आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास सुनिता पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांनी हे ऑपरेशन केले होते. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी आरोप केला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version