Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू : नातेवाईकांचा आरोप

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अवचित काळु तायडे (वय ४६ रा.समतानगर) हे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होते. त्यांचा सोमवार दि. ४ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अवचित काळे हे मजुरी काम करतात. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डाव्या बाजूने पॅरालिसिस सारखा त्रास जाणवत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी पाहिजे ते उपचार अवचित काळे यांच्यावर करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी दिवसभर केवळ सलाइन लावून ठेवले तर रात्री आॅक्सिजन लावला. मात्र ऑक्सिजनची नळी मशीनला न लावता जमिनीवर पडलेली असल्याचे दिसली. याबाबतचा व्हिडिओसुद्धा नातेवाईकांकडे आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक हॉस्पीटलमध्ये मेंदूचा डॉक्टर नसल्याचे उत्तर नातेवाईकांना दिले तसेच त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवाव लागेल असे सांगितले. याच दरम्यान अवचित काळे यांचा मृत्यू झाला.

पोलिसांत देणार तक्रार 
डॉक्टरांनी दिवसभर कुठलेही उपचार केले नाही तसेच लक्षही दिले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही अवचित यांच्या नातेवाईकांनी केली असून याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.

ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही या वेळी महानगराध्यक्ष अडकमोल यांनी दिला आहे. मयत अवचित काळे यांच्या पश्चात पत्नी शारदा , मुलगा राहुल तसेच विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version