Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डीन जोन्स यांचे मुंबईत निधन

मुंबई वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक डीन जोन्स यांचे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. जोन्स आयपीएलसाठी मुंबईत आले होते. ते आयपीएलच्या समालोचक टीममधील एक सदस्य होते.

हृदयविकाराचा धक्का बसण्याआधी डीन जोन्स यांची प्रकृती उत्तम होती. ते अचानक कोसळून खाली पडले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऑस्ट्रेलियात असलेल्या कुटुंबियांना कळवण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी नाष्टा झाल्यानंतर आयपीएलच्या आजच्या सामन्यासाठी ते सहकाऱ्यांसोबत चर्चा करत होते. आयपीएलच्या समालोचक टीममध्ये असलेले डीन जोन्स गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते.

आयपीएलच्या सामन्याबद्दल चर्चा करत असताना डीन जोन्स अचानक खाली कोसळले. या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली आणि जोन्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डीन जोन्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी सामन्यात ३ हजार ६३१ धावा केल्या आहेत. यात ११ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता. २१६ ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च खेळी होती. ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी १६४ वनडे सामने खेळले. वनडेमध्ये त्यांनी ४४.६१च्या सरासरीने ६ हजार ०६८ धावा केल्या. जोन्स यांनी वनडेत ७ शतक आणि ४६ अर्धशतक केली होती. १४५ ही त्यांची वनडेतील सर्वोच्च खेळी होती.

Exit mobile version