Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाण्यात नगरसेवकाच्या मुलाची हत्या

ठाणे वृत्तसंस्था । बंगल्याची वाटणी आणि मालमत्तेच्या वादातून ठाण्यातील नगरसेवक माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील(३४) याची गोळी झाडून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. राकेशचा खून त्याचा सावत्र भाऊ सचिन पाटील आणि नगरसेवक माणिक पाटील यांचा वाहनचालक गौरव सिंह(२७) यांनी केल्याचे समोर आले असून दोघांवर कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडबंदर येथील विजय गार्डन परिसरात नगरसेवक माणिक पाटील यांचा बंगला आहे. माणिक पाटील यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. चार दिवसांपूर्वी उपचार घेऊन घरी परतल्यानंतर घरातील तिजोरी फोडल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मुलगा राकेश हा देखील घरात आढळून आला नाही. याबाबत माणिक पाटील यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी तपास केला असता राकेश याचा खून झाला असून तो माणिक पाटील यांचा वाहनचालक गौरव सिंह याने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून आझादनगर येथून गौरवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता बंगल्याची वाटणी आणि मालमत्तेसाठी सचिनने राकेशच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पुढे आली.

२० सप्टेंबर रोजी सचिनने राकेशवर गोळी झाडून हत्या केल्याचे तसेच हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी राकेशचा मृतदेह वाशी खाडीत फेकून दिल्याचे गौरवने सांगितले. कासारवडवली पोलिसांनी गौरवला अटक केली असून सचिनचा शोध सुरू आहे.

Exit mobile version