Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रम्प यांनीच हिंसा घडवून आणल्याचा ओबामांचा आरोप

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । येथील कॅपिटॉल इमारतीत घडलेल्या हिंसेची इतिहासात नोंद घेतली जाईल. हिंसा सध्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने भडकवल्याने घडल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे

ही व्यक्ती कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या निवडणुकांबद्दल सातत्याने खोटे आरोप करत आहे. ही घटना लज्जास्पद आणि अपमानजनक आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. मात्र ही हिंसा अचानक घडलेली नसून ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रुपात पाहायला मिळत असल्याचेही ओबामा म्हणाले आहेत.

आज कॅपिटॉलमध्ये जे घडलं ते अनपेक्षित आहे असं आपण म्हणत असू तर आपण स्वत:चं हसं करुन घेण्यासारखा प्रकार ठरेल, अशा शब्दांमध्ये ओबामांनी अमेरिकन जनतेला मागील काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा हवाला देत आरसा दाखवला.
.

दोन महिन्यांपासून देशातील एक मोठा राजकीय पक्ष आणि त्याच्यासोबत असणारी प्रसारमाध्यम त्यांच्या पाठीराख्यांना सत्य दाखवण्यापासून दूर पळत आहेत. ही निवडणूक अटीतटीची झालेली नाही हे सत्य असून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. मात्र याला विरोध करणारे ज्या रंजक कहाण्या सांगत आहेत त्या गोल गोल फिरत असून सत्यापासून खूप दूर आहेत. मागील अनेक वर्षांपासून असलेली चीड या खोट्या दाव्यांच्या माध्यमातून समोर येत आहे. हीच चीड आणि त्याचे परिणाम आज आपल्याला हिंसेच्या रुपात दिसत असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे.

लोकशाहीच्या सदनामध्ये रिपब्लिकन नेत्यांनी कोणता पर्याय निवडला आहे हे आता दाखवून दिलं आहे. त्यांना याच मार्गाने जायचं असल्यास त्यांनी अशाच हिंसेला प्रोत्साहन देत रहावे किंवा त्यांनी सत्य स्वीकारुन या हिंसेची आग शांत करण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं. ते अमेरिकेसोबत आहेत असं त्यांनी दाखवून द्यावं, असं आवाहनही ओबामा यांनी ट्रम्प समर्थक रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना केलं आहे.

आज राष्ट्राध्यक्षांच्या पक्षातील अनेकांना बळजबरीने बोलायला भाग पाडण्यात आलं हे पाहून मला दु:ख झालं. त्यांच्या या बोलण्यामधून रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली देशाची काय अवस्था झालीय हे दिसून येत आहे. जॉर्जियासारख्या राज्यांमधील स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्यास नकार देत प्रामाणिकपणे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, यावरुनही देशाच्या परिस्थितीचा अंदाज येतो. आपल्याला या अशा प्रामाणिक नेत्यांची सध्याच्या काळात आणि भविष्यातही गरज आहे. देशाचा खरा राजकीय हेतू काय आहे हे लक्षात घेऊन तो पूर्वव्रत करण्यासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काम करतील. आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता एक अमेरिकन म्हणून आपण जो यांना हे ध्येय साकार करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे, असं भावनिक आवाहनही ओबामा यांनी केलं आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या हिंसेचा निषेध केला आहे. कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला तो अमेरिकेचा खरा चेहरा नाही. कायदा न मानणाऱ्या अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. हा देशद्रोहाचा मार्ग असून तो थांबलाच पाहिजे, असं बायडेन म्हणाले आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सत्ता हस्तांतरण हे शांततापूर्ण मार्गेने झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. “वॉशिंग्टनमधील हिंसाचाराच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो. शांततेच्या मार्गाने सत्ता हस्तांतरण झालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागता कामा नये,” असं मोदी म्हणाले .

Exit mobile version