Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रम्प यांना रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही – आठवले

 

मुंबई : वृत्तसंस्था । अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिमा कलंकित करून घेतली आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आम्हाला आदर होता मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदाला चिकटून राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जोसेफ बायडन यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या विजयला संमती देण्यात आडकाठी आणायचे हीन कृत्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे. असे ना. रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत.निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून ट्रम्प यांनी नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर करून ट्रम्प यांनी रिपब्लिकन चा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे.भारतात ग्राम पंचायत पासून संसदे पर्यंत लोकशाही च्या न्यायानुसर बहुमताचा ; जन मताचा सन्मान केला जातो. मात्र जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतर होताना ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही असा घणाघात ना रामदास आठवले यांनी केला आहे.

Exit mobile version