Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रम्प यांचा अमेरिकेपेक्षा भारतातील करभरणा जास्त !

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दीड महिन्यांहून कमी कालावधी राहिला असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढत आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेत कर भरला नसल्याचे समोर आले आहे. अमेरिकेपेक्षा ट्रम्प यांनी भारतात सर्वाधिक कर भरला असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेतील दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित करचोरी प्रकरणी वृत्त प्रकाशित केले आहे. त्यानुसार, सन २००० नंतरच्या १५ वर्षांपैकी दहा वर्षांत ट्रम्प यांनी कर भरणा टाळला आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरच्या पहिल्या वर्षात ट्रम्प यांनी केवळ ७५० डॉलरचा (जवळपास ५५ हजार रुपये) कर भरला आहे. दुसरीकडे त्या तुलनेत भारतामध्ये सर्वाधिक कर भरला आहे. ट्रम्प यांनी भारतात एक लाख ४५ हजार डॉलर म्हणजे जवळपास एक कोटी सात लाख रुपयांचा कर भरणा केला आहे.

आपल्या कर परताव्याबाबत माहिती जाहीर न करणारे डोनाल्ड ट्रम्प हे १९७० नंतरचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर या वृत्तामुळं खळबळ उडाली आहे. हे वृत्त प्रसिद्ध होताच ट्रम्प यांनी रविवारी व्हाइट हाउसमध्ये पत्रकार परिषद घेतली. ‘मी मोठ्या प्रमाणावर कर भरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फेडरल टॅक्स बरोबरच राज्यांतही टॅक्स भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपले इन्कम टॅक्स रिटर्न सार्वजनिक करण्याची तयारीही ट्रम्प यांनी दर्शवली आहे. अर्थात, देशाच्या तिजोरीत कराच्या रूपाने नेमकी किती रक्कम भरली हे ट्रम्प यांना सांगता आले नाही. हा प्रश्न येताच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

ट्रम्प यांच्या कंपनीचे प्रवक्ते अॅलन गार्टन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त तथ्यावर आधारलेले नाही. ट्रम्प यांनी व्यक्तिगत उत्पन्नातून कोट्यवधी डॉलरचा कर फेडरला सरकारला दिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी झाल्यानंतरच्या २०१५ वर्षातील कराचाही यात समावेश आहे, असं गार्टन यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version