Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टोलनाक्यांवर १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोलमुक्ती

 

मुंबई: वृत्तसंस्था । टोल नाक्यांवर १०० मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या असतील, तर टोल न आकारताच आता वाहनांना पुढे पाठवण्यात येणार आहे.

 

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल नाक्यांसाठी नवीन मागर्दशक तत्त्वे आखली आहेत.

 

या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी टोल नाक्यांवर १०० मीटरपर्यंत पिवळी रेषा आखली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. जोपर्यंत वाहनांची रांग १०० मीटरपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्या चालकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद केले आहे.

 

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर टोलची रक्कम ऑनलाइनच घेतली जाते. फास्टॅगमार्फत टोल घेताना प्रवाशांचा झटपट प्रवास होईल, अशी आशा प्राधिकरणाला होती. परंतु काही टोल नाक्यांवर टोल घेताना तांत्रिक कारणास्तव बराच वेळ जातो. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राधिकरणाकडे येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर चालकांना होणारा मनस्ताप पाहता नवीन मागदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.  गर्दीच्या वेळी प्रत्येक वाहनाला दहा सेकंदापेक्षा अधिक थांबावे लागू नये असे उद्दिष्ट ठेवून नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

 

Exit mobile version