Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टेलिमार्केटिंग करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दूरसंचार ग्राहकांना विनाकारण फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्ती किंवा टेलिमार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी  अधिकाऱ्यांना दिले.

 

.डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावेत यासाठी सोमवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत  प्रसाद यांनी  हे आदेश दिले.

 

या बैठकीमध्ये डू नॉट डिस्टर्ब  नोंदणीकृत ग्राहकांना एस एम एस  किंवा कॉल करणाऱ्या टेलिमार्केटरवर  संबंधित टेलिकॉम कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचा निर्णय केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतलाय. डू नॉट डिस्टर्ब   नोंदणीकृत ग्राहकांसाठी असलेले नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करावी आणि कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा असे निर्देश प्रसाद यांनी दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

 

यासोबतच, दूरसंचार संबंधित फसवणूकींच्या प्रकाराच्या चौकशीसाठी एजन्सींसोबत समन्वय साधण्यासाठी “डिजिटल इंटेलिजेंस युनिट” नोडल एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दूरसंचार विभागाकडून परवाना व्यवस्थापन क्षेत्र पातळीवर फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार संसाधनांचा गैरवापर करून होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेब, मोबाईल अॅप्लिकेशन आणि एसएमएस आधारित प्रणाली विकसित करण्यावरही जोर दिला जात आहे.

Exit mobile version