Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झारखंडामध्येही हाथरससारख्या घटनेने पीडितेच्या वडील कोर्टात

रांची : वृत्तसंस्था । गिरिडिह येथील पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळल्याच्या गुन्ह्यात तात्पुरत्या तपासावरून झारखंड उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले ‘हाथरस केवळ उत्तर प्रदेशमध्ये नाही, तर झारखंडमध्येदेखील आहे,’ अशी कठोर टिप्पणी केली आहे.

पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. आनंद सेन यांनी पोलिसांचा तपास हा तपासाच्या नावाखाली केलेली धूळफेक आहे, असे नमूद केले; पोलिस महासंचालक एम. व्ही. राव यांना विशेष तपास पथक स्थापन करण्याची सूचनादेखील केली. गिरिडिह येथे पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून नंतर रॉकेल टाकून जिवंत पेटवून देण्यात आले होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला त्या क्षणी पकडलेदेखील होते. मात्र, त्याचे नातेवाइक त्याला सोडवून घेऊन गेले, अशी नोंद ३० मार्च रोजी दाखल करण्यात आलेल्या ‘एफआयआर’मध्ये आहे.

शवविच्छेदवनाच्या अहवालात पीडिता शंभर टक्के जळाली असल्याची नोंद आहे; तरीदेखील पोलिसांनी ढिसाळपणे तपास केला. पोलिसांच्या या कारभारामुळे हाथरस केवळ उत्तर प्रदेशमध्ये नाही, तर झारखंडमध्येदेखील आहे, असे सांगण्याची वेळ न्यायालयावर आली आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

‘पीडितेचा ‘स्वॅब’ २० मे रोजी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. मात्र, हा उशीर का झाला, याचे कारण तपासाच्या डायरीत कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. न्यायालय अशा प्रकारच्या हलगर्जीपणाला डोळे बंद करून सहन करू शकत नाही. गंभीर तत्काळ कारवाई आणि तपास होण्याची गरज आहे,’ असे न्या. सेन म्हणाले.

Exit mobile version