Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची तेरा पारितोषिके

मुंबई/ जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध १३ गटातून प्लेक्स कौन्सिलचे प्रथम क्रमांकाचे निर्यात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हे पुरस्कार मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आले आहेत.

 

मुंबई येथे प्लेक्स कौन्सिलचे २०१७-१८ , २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१ अशा चार आर्थिक वर्षातील १२ प्रथम पुरस्कार व एक द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी कंपनीच्या ड्रीप इरिगेशन विभागाच्या उत्तुंग कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार स्वीकारला. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने त्या-त्या विभागासाठीचे पुरस्कारदेखील कंपनीच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते, प्लेक्स कौन्सिलचे चेअरमन अरविंद गोयंका, व्हाईस चेअरमन हेमंत मिनोचा, कार्यकारी संचालक श्रीभाष दासमोहपात्रा, रविश कामत, मुंबई विभाग आयकर आयुक्त आलोककुमार या मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारोह पार पडला. कृषी व कृषी उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक किर्तीची अग्रणी कंपनी जैन इरिगेशनने प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीत उच्चांक राखत २०१७-२१ या वर्षासाठी ठिबक सिंचन (एमआयएस), पीव्हीसी फोम शीट, पाईप्स अॅण्ड होजेस विभागांना पहिल्या क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली. २०१९-२० या वर्षासाठी पाईप्स अॅण्ड होज फिटींगया विभागाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले. कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील कंपनीने उत्पादन व निर्यातीत वर्चस्व कायम ठेवत सर्वोत्तम कामगिरी केली हे या पुरस्कारासासाठी अधोरेखित झाले. कंपनीच्या वतीने चारही वर्षांच्या या एकूण १३ पुरस्कारांचा स्वीकार सहकाऱ्यांनी केला. त्यामध्ये पी. सेनगोट्टीयन, मनिष झेंडे, अजय काळे, संदीप जैन, प्रसाद दुर्गे, विजयसिंग पाटील, प्रवीण कुमट, नितीन चौधरी, संदीप पाटील, राजेंद्र लोढा, महेश इंगळे, प्रशांत जयस्वाल आणि भरत बडगुजर या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे १९५५ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे १९९१ पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.

पुरस्कार प्राप्त केल्यानंतर जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले की, कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कै. भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक होय, ते म्हणत असत की, “गुणवत्तेच्या जोरावरच आपण स्पर्धेला पात्र ठरू शकतो; किंबहुना स्पर्धकांना मागे टाकू शकतो. तसेच चोखंदळ ग्राहक व बाजारपेठ आपणास जागतिक कीर्ती मिळवून देऊन अग्रस्थानी बसवू शकते.” उत्तम, उदात्त, गुणवत्तेचा ध्यास घेत भविष्यात अनेक दर्जेदार वस्तु, शेतीत प्लास्टिकल्चर कशा वापरता येईल याकडे लक्ष दिले. जैन इरिगेशनला १९९१ पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहेत. कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, त्यांच्या कष्टाचा, समर्पण भावनेचा हा सन्मान आहे असे मी मानतो.”

Exit mobile version