Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेईई, नीट परीक्षा केंद्राच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली- जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ‘जेईई’ तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा निर्धारित तारखेला होणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षा केंद्राच्या संख्येत वाढ केली असून जेईई मेन्सची परीक्षा 8 ऐवजी 12 टप्प्यांत होणार आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेईई मेन्स परीक्षा होत असून 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा होत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे, तथापि निर्धारित कालावधीत परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे केंद्र सरकार आणि एनटीएकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षेचे सर्व उपाय अंमलात आणून परीक्षा घेतली जाईल. यासाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे टप्पे वाढविण्यात आले आहेत.

सुरक्षा उपायांमध्ये विद्यार्थ्यांना लांब-लांब बसविणे, विद्यार्थ्यांच्या केंद्रावरील प्रवेशावेळी आवश्यक ती खबरदारी घेणे, मास्क, हँड ग्लोव्हजचा वापर, ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर ठेवणे, सामाजिक दूरत्वाचा सर्व नियमांचे पालन आदी उपायांचा अवलंब केला जाणार आहे.

जेईईसाठी परीक्षा केंद्राची संख्या 570 वरून 660 पर्यंत वाढविण्यात आली असून नीटसाठी परीक्षा केंद्राची संख्या 2 हजार 546 वरून 3 हजार 843 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जेईई मेन्स परीक्षा संगणकावर होणार आहे तर नीट परीक्षा पेन -पेपरद्वारे होणार आहे. जेईई परीक्षेचे टप्पे 8 वरून 12 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. प्रतिशिफ्ट उमेदवारांची संख्या 1.32 लाखांवरून कमी करून 85 हजारांवर आणण्यात आली आहे.

Exit mobile version