Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुलै – ऑगस्टमध्ये स्पुटनिक लसींचा मोठा साठा महाराष्ट्राला मिळणार

 

मुंबई: वृत्तसंस्था । आता येत्या जुलै ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये स्पुतनिक लशींचा मोठा साठा राज्याला उपलब्ध होणार आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

 

केंद्र सरकारकडून पुरेसा लससाठी उपलब्ध झाला नसल्याने राज्य सरकारच्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या महत्वाकांक्षी मोहिमेला खिळ बसली आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून रशियाच्या स्पुतनिक या लशीद्वारे मोठी आशा निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्पुतनिक लशीच्या वितरकांशी चर्चा देखील केली आहे.

 

राज्यांमधील लशींच्या उपलब्धतेचा प्रश्न मिटावा यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लस आयातीचे एक स्पष्ट धोरण ठरवणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसे झाल्यास हा प्रश्न जलदगतीने सुटण्यास मदत होणार आहे.

 

कोरोना विरुद्धची लढाई लढत असताना लस घेतलेल्या नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. ज्या नागरिकांनी दोन लशी घेतल्या असतील, अशांनीही सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. दोन लशींचे डोस घेतलेल्या नागरिकांनी देखील मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे  अत्यंत आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेच टोपे म्हणाले.

 

जेव्हा लशींचे दोन डोस घेतले जातात तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी तयार होत असतात. शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र लशींचे डोस घेतलेल्या व्यक्तींकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी देखील मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

Exit mobile version