Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीवनात ध्येय साध्यासाठी प्रयत्न आणि सकारात्मकता हवे ! – आसावरी काकडे

भुसावळ प्रतिनिधी । आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाची कास धरली पाहिजे. कोणत्याही भ्रमात न राहता वास्तव आनंदाने स्वीकारले पाहिजे. यश मिळत नाही म्हणून आपण जेथे थांबतो तेथून चिकाटीने आणखी थोडे पुढे गेल्यास यश निश्चितच मिळते. याचा अर्थ ध्येय साध्यासाठी प्रयत्न आणि सकारात्मकता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “खोद आणखी थोडेसे” या कवितेच्या कवयित्री आसावरी काकडे यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या सत्रात कवयित्री काकडे यांनी शिक्षकांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक व नियोजन केले. दिलीप वैद्य यांनी कवयित्री आसावरी काकडे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर आपल्या संवाद सत्रात बोलताना कवयित्री काकडे म्हणाल्या की, परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही. त्यासाठी संयम, संवेदनशीलता, सकारात्मकता, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास यांची गरज असते. तसेच नकारात्मक विचार करू नये, विजयाने हुरळून जाऊ नये, आपल्या मनातील विचार व्यक्त केले पाहिजेत, त्यामुळे आपल्या आत्मिक आनंद देखील मिळत असतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करत असाल त्यापेक्षा आणखी थोडेसे जास्त प्रयत्न जर केले तर आपल्याला नक्कीच ध्येयाची प्राप्ती होईल. तब्बल तासभर सुरू असलेल्या या ऑनलाईन संवाद सत्र त्यांनी कविता निर्मितीमागची भूमिका सांगून लेखन प्रवास कथन केला. तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कवयित्री काकडे यांनी देवून कवितेतील अपरिचित शब्दांचा अर्थ देखील उलगडून दाखवला.

Exit mobile version