Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जि.प.च्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांना उद्यापासून शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उद्या मंगळवार, २५ ऑगस्ट पासून नियमित शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसे आदेश सोमवारी प्राथमिक शिक्षण विभागाने काढले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्यासह जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या़ त्यात परीक्षाही रद्द झाल्या. चार महिने उलटून देखील कोरोना संसर्ग कमी न झाल्यामुळे शाळा आजही बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ऑनलाईन पध्दतीने शाळा मात्र सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारपासून जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत़ तर शाळेच्या नेहमीच्या वेळेप्रमाणे पूर्ण वेळ शाळेत थांबून ऑनलाईन, ऑफलाईन तसेच समुह, गटपध्दतीने शिक्षण प्रक्रिया सुरू करावी, असेही शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

अहवाल तयार होणार
मुख्याध्यापक व शिक्षक शाळेत आल्यानंतर शिक्षकांच्या उपस्थितीचा व शिक्षण प्रक्रिया सुरू झाल्याचा अहवाल तयार केला जाणार आहे़ तो अहवाल केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकाऱ्‍यांना, त्यानंतर शिक्षण विस्तार आधिकारी गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल, अशाही सूचना केल्या आहेत.

Exit mobile version