Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जि. प. च्या डिजीटल बुकमध्ये विजय लुल्हे यांच्या उपक्रमाचा समावेश

 

जळगाव, प्रतिनिधी । ‘आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार’ या डिजिटल बुकमध्ये विजय लुल्हे यांच्या”राष्ट्रपिता महात्मा गांधी : वैश्विक व्यक्तिमत्त्व ” या दर्जेदार मुल्याधिष्ठित उपक्रमाची निवड होऊन याचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आयटीसेलचा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘आपला जिल्हा आपले उपक्रम ‘ भाग चार या डिजिटल बुकचे प्रकाशन नुकतेच नाशिक येथे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांकडून उपक्रम मागवण्यात आले होते त्यातून निवड झालेले सर्वोत्कृष्ट उपक्रम डिजिटल बुकमध्ये प्रकाशित झाले. या बुकमध्ये जळगाव तालुक्यातील तरसोद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी : वैश्विक व्यक्तिमत्त्व ” या दर्जेदार मुल्याधिष्ठित उपक्रमाची निवड होऊन तो उपक्रम पंचवीस अनुक्रमांकाने समाविष्ट करण्यात आला.

विद्यार्थीदशेत संवेदनशीलकाळात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या वैश्विक व्यक्तिमत्त्वाचा समग्र परिचय चरित्रातील ऐतिहासिक घटना व स्वातंत्र्य लढयातील जनआंदोलनांच्या अनुषंगाने देणे. डोळसपणे महात्म्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसीत व्हावा या उद्दिष्टाने उपरोक्त उपक्रम महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीच्या औचित्याने राबविण्यात आला. महात्मा गांधीजींच्या विचारांची रचनात्मक कार्यांची महती रुजविण्यासाठी विविधांगी शालेय व शाळाबाह्य उपक्रम लुल्हे यांनी स्वखर्चातून राबविले. गांधी रीसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने “मोहन ते महात्मा” जीवन चरित्र चित्र प्रदर्शन ,परिसर स्वच्छता कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या चरित्र पुस्तकांची पारितोषिके दिली. समाजशास्र महाविद्यालयात ” विचार मंथन व पोस्टर्स प्रदर्शन ” कार्यक्रम निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. महात्मा गांधीजींवरील लोकराज्य मासिकाचे ‘ युगपुरुष ‘ दिडशे विशेषांक व महात्मा गांधीजीप्रणीत ‘ सात सामाजिक पातके ‘ तसेच ‘ एकादश व्रते ‘ स्वसंकलित दिडशे पोस्टर्स १५० व्या गांधी जयंतीच्या औचित्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते दलुबाबा जैन, महात्मा गांधी अभ्यासक डॉ. भुजंगराव बोबडे, उदय महाजन, किशोर कुलकर्णी यांसह शिक्षण, सामाजिक व अन्य क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह वृतपत्रांच्या संपादकांना मोफत भेट दिली. महात्मा गांधीजींवरील उपक्रम विजय लुल्हे यांनी सर्वस्तरावर पोहोचवून प्रबोधन केल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version