Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्या बाहेरून कापूस येऊ नये यासाठी सीमेवर चेकपोस्ट उभारण्याचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातीलच शेतकर्‍यांना प्राधान्य मिळावे यासाठी बाहेरील शेतकरी व व्यापार्‍यांना मज्जाव करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सीमेवर चेकपोस्ट उभारण्याचे आदेश दिले असून बाहेरून कापूस आणण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांचा माल हा घरातच पडून आहे. सीसीआय आणि पणन महासंघातर्फे कापूस खरेदी करण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील ४८३९१ शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या माध्यमातून नोंदणी केलेली आहे. या अनुषंगाने उद्या म्हणजे रविवार दिनांक २४ मे पासून कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात येत आहे. शासकीय खरेदीचा दर हा खासगी बाजारपेठेपेक्षा जास्त असल्याने काही व्यापारी हे शेतकर्‍यांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा आणि राज्याच्या बाहेरून कापूस आणून जिल्ह्यात विकण्याची शक्यता आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कापूस विक्रीसाठी प्राधान्य मिळावे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील सीमांवर चेकपोस्ट उभारण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

Exit mobile version