Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यास मिळाल्या १३ रूग्णवाहिका; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

 

जळगाव : प्रतिनिधी । कोविड आपत्तीमुळे जिल्ह्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे नवीन अद्ययावत रूग्णवाहिकांची मागणी केली होती. या पूर्ततेचा पहिला टप्पा पार पडला असून आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १३ रूग्णवाहिकांचे हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.

 

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या.  कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. तर उर्वरित रूग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

 

या रूग्णवाहिकांचे आज जिल्हा रूग्णालयात लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून या रूग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. या १३  रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना प्रदान करण्यात आल्या

 

एक मोठ्या वाहनातील अद्ययावत सामग्रीने सज्ज असणारी मोबाईल मेडिकल युनिट ही रूग्णवाहिका आहे. ही रूग्णवाहिका जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर आदी तालुक्यांमधील आदिवासी बहुल भागांमध्ये नियमितपणे फिरवण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील रूग्णांना देखील थेट त्यांच्या पाड्यावर अद्ययावत उपचार मिळणार आहेत.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा रूग्णालयात या रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. यात चालकांना चाव्या देऊन अ‍ॅब्युलन्सेसला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. याप्रसंगी रूग्णवाहिका चालकांचा  प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही प्रकारातील रूग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असते. यात बर्‍याच रूग्णांना अँब्युलन्सची आवश्यकता पडत असते. या पेशंटसाठी रूग्णवाहिका मिळावी यासाठी आपण पाठपुरावा केला असून आता उर्वरित अ‍ॅब्युलन्सेसही लवकरच मिळणार आहेत. जिल्ह्यात रूग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

 

जिल्ह्यातील पाल , रावेर , अमळनेर या ग्रामीण रुग्णालयाना  तसेच मुक्ताईनगर व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाला अशा 5 ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्र  मांडळ (अमळनेर ) , कजगाव (भडगाव ) , रांजणगाव व उंबरखेड (चाळीसगाव) ,  अडावद व वैजापूर (चोपडा ), वाकोद  (जामनेर) , लोहारा (पाचोरा)  या  8 प्रा. आ. केंद्रात रुग्णवाहिका मिळाल्याने त्या – त्या परिसरातील  रुग्णांना  दिलासा मिळणार आहे.

 

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना ताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद,  जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार , जि .प . चे आरोग्य सभापती रवींद्र पाटील,  जि.प.सदस्य अमित पाटील,  दीपक राजपूत , उद्धव मराठे, टेम्पो फोर्स कंपनीचे संचालक चंद्रशेखर अग्रवाल ,  आतिष सोनवणे, सेवा अभियंता विवेक नारखेडे यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

 

Exit mobile version