Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 87.87 टक्क्यांवर

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात 20 हजार 809 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.87 टक्क्यांवर पोहोचले असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 358 ने कमी झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात 28 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 49 हजार 104 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. असे असले तरी जळगाव महसुल, पोलीस, जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमाने त्यापैकी 43 हजार 148 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश येत असून या रुग्णांचे वेळेत निदान करुन त्यांचेवर त्वरीत उपचार करण्यात येत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच आहे शिवाय रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 20 हजार 589 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असले तरी याच महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 220 ने अधिक आहे. या महिन्यात 20 हजार 809 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात महिन्याभरात 371 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर 2.43 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यातही प्रशासनाला यश आले आहे. त्याचबरोबर गेल्या सोळा दिवसांपासून जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 10 हजार 116 वरुन 4 हजार 758 पर्यंत म्हणजेच 5 हजार 358 ने कमी झाली आहे. हे जिल्ह्यासाठी आशादायक चित्र आहे.

जिल्ह्यात बाधित रुगण कमी होऊन बरे होणाऱ्या रुगणांचे प्रमाण वाढत असले तरी नागरीकांनी बेसावध न राहता बाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर राखावे, दिवसभरात किमान चारवेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version