Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात कोरोनाचे १६९ नवीन रूग्ण; जळगावात संसर्ग वाढलेलाच

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरातील संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबत अमळनेर, एरंडोल, जामनेर, बोदवड आदी तालुक्यांमध्येही संसर्ग वाढीस लागल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५७ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल अमळनेर येथे १८; बोदवड-१६; एरंडोल व जामनेर- प्रत्येकी १४ रूग्ण आढळून आले आहेत.

अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१२; भुसावळ-९; चोपडा-४; पाचोरा-१; भडगाव व धरणगाव- प्रत्येकी ३; यावल-८; रावेर-५; पारोळा-२ व मुक्ताईनगर १ अशी रूग्णसंख्या आहे. दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४१७६ इतका झालेला आहे. यातील २४७६ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज ११ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या २६३ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

जळगावात काल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले होते. या पाठोपाठ आज देखील ५७ रूग्ण कोरोनाने बाधीत असल्याचे दिसून आल्याने शहरातील संसर्ग कमी होत नसल्याचे अधोरेखीत झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी जळगावसह भुसावळ व अमळनेरात ७ ते १३ जुलै दरम्यान सक्तीच्या लॉकडाऊनची घोषणा केली असून यामुळे तरी संसर्ग कमी होईल अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version