Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात काटेकोर नियम पाळून कोरोना साखळी खंडित करा — पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

 

 

जळगाव  : प्रतिनिधी ।  कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी नियमावलीची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश  पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

 

 

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व प्रशासनाची  बैठक  झाली. या बैठकीस खा रक्षाताई खडसे, खा उन्मेश पाटील, आ सर्वश्री. संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील आदि उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरानाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन  तपासणी करावी. रुग्णांना उपचार तातडीने मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांमध्ये सोईसुविधा उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी. रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कालावधीत विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. रेमडेसिविरचा साठा पुरेसा ठेवावा. रुगणालयांमध्ये पुरेशे व्हेटिलेटर रहातील याचे नियोजन करावे. अत्यावश्यक सेवेतील नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घेताना विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी  दिले.

कोविडवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक करण्याबरोबरच रुग्णांना रुग्णालयांचे  बील देणे आवश्यक असून चोपडा येथे तातडीने व्हेटीलेटर उपलब्ध करण्याची सूचना खा रक्षाताई खडसे यांनी केली. कंटेमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना खा उन्मेष पाटील यांनी केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांचे सहकार्य महत्वाचे आहे. नागरीकांमध्ये शिस्त निर्माण करणे आवश्यक असल्याचे आ शिरीष चौधरी म्हणाले तर संजय सावकारे यांनी बाधित रुग्णांना वेळेवर उपचार होण्यासाठी भुसावळ येथील रेल्वेचे हॉस्पिटल ताब्यात घेण्याची सूचना केली. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी रात्रीच्यावेळी सुरु रहावी याकरीता महानगरपालिकेने आवश्यक ते नियेाजन करण्याची सूचना आ सुरेश भोळे यांनी केली जिल्ह्यात  नियमावलीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास लॉकडाऊन करावा कोरोनामुळे ग्रामीण भागातील जनतेत भितीचे वातावरण आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे आ किशोर पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात तीन दिवस रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. आता मुलबक साठा असून अजून इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्यावतीने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचे आवश्यक ते सहकार्य मिळत असून जिल्हावासियांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी  केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलीस प्रभारींना दिल्या असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ मुंढे यांनी सांगितले.

Exit mobile version