Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख संशयितांच्या कोरोना चाचण्या

 

जळगाव : प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी  म्हणून  कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आलेल्या 8 लाख 92 हजार 80 व्यक्तींच्या  कोरोना  चाचण्या  करण्यात  आल्या  आहेत , अशी माहिती आज जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली 

 

या पैकी  काल पर्यंत 1 लाख 17 हजार 916 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपायायोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 13 टक्क्यांपर्यत खाली आला असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली

 

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहेत. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटूंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.  बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेही स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. जेणेकरुन बाधित रुग्णांचा लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.

 

संशयितांची तपासणी लवकर होऊन त्यांचा अहवाल त्वरीत प्राप्त व्हावा म्हणून  जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर आयोजित करण्यात येत आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती व संशयितांचे स्वॅब तपासण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. संशयितांचे अहवाल वेळेत मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार खाजगी प्रयोगशाळांकडेही अहवाल तपासण्यासाठी पाठविले जातात.

कोरोनाचा साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन 5 ते 10 हजार कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या 8 लाख 92 हजार 80 व्यक्तींच्या कोरोना तपासणीपैकी 6 लाख 21 हजार 750 व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून यापैकी 67 हजार 461 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 2 लाख 70 हजार 330 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून पैकी 50 हजार 455 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.  1 हजार 689 ईतर अहवाल आढळले असून सध्या अवघे 989 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

त्वरीत निदान, त्वरीत उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तींस कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरीत नजिकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी  राऊत यांनी केले आहे.

Exit mobile version