जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली; रेशन दुकानदार जिल्हा पुरवठा कार्यालयात

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली असून रेशन दुकानदार जिल्हा पुरवठा कार्यालयात पोहोचले आहेत. धान्याचा पुरवठा एक महिना उशीराने झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून घाटाखालील तालुक्यांमध्ये रेशनचे वाटप झालेले नाही.

सरकार मान्य धान्य दुकानात धान्य मालाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळत नाही. त्यामुळे गरीब जनतेने काय करावं ? असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यात उपस्थित होत आहे.

आता मे महिना संपत आलं तरी घाटाखालील तालुक्यातील खामगाव, मलकापूर, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांमध्ये  रेशनचे वाटप झालेले नाही. मे महिन्याची धान्य उचलची चालान प्रश्नासनाकडून फाडण्यात आलेली नाही. जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजनाचा अभाव असल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसत असून रेशन दुकानदार त्रस्त झाले आहे. रेशन दुकानदार संघटनेने प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या.

बुलडाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त पदभार बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. बुलडाणा हे जिल्हा मुख्यालय असल्याने येथील तहसीलदार खंडारे यांच्याकडे आगोदरच अधिक कामे असतात अशात त्यांच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढलेला आहे.

मागील काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यात रेशनचे धान्य वेळेवर गावात पोहोचत नाही. मागील एप्रिल महिन्याचं धान्य मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वितरित करण्यात आलं. इकडे लाभार्थी धान्य घेण्यासाठी वारंवार दुकानादारांना जाब विचारत आहे. तर त्यांना उत्तर देत दुकानादारांच्या नाकी नऊ येत आहे. वेळवर धान्य पुरवठा करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश खंडारे यांची भेट घेऊन धान्य पुरवठा वेळेवर करण्याची मागणी केली आहे.

Protected Content