Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा : भाजपाची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । कोविड १९ रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. 

जळगाव जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या कित्येक दिवसांपासून नऊशेच्या वरच येत असून काल एक हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. आज जळगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांना शासकीय, खाजगी रुग्णालयात बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासन कुठे कमी पडत आहे याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षी लोकांमध्ये कोरोनाची असलेली भीती आज राहिलेली नाही. नागरिक सॅनीटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे यासारखे उपाययोजना करतांना दिसून येत नाही. शहरात व ग्रामीण भागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा दिली असली तरी प्रत्येकाकडे स्वतन्त्र खोलीची व्यवस्था नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना याचा संसर्ग वाढत असून यातील बरेच जण फिरतांना दिसून येत आहेत. रुग्ण संख्या वाढत असतांना त्यांच्यासाठी पुरेसे बेड उपलब्ध नाहीत. त्यातच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर नसल्याने तेथे सामाजिक संस्था, संघटना यांनी पुढाकार घेवून सेंटर चालू करावेत. कोरोनाच्या या महामारीत वैद्यकीय उपचार करणारे कोरोना योद्धे देखील कोरोनाग्रस्त होत असल्याने मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मधील कोरोना योद्धे लढा देत आहेत तसाच लढा, उपचार इतर पथीच्या महाविद्यालयात, हॉस्पिटलमध्ये देखील सुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व सब सेंटर येथे लसीकरण व्यवस्था करण्यात यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हापरिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील,  डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.       

 

Exit mobile version