Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यातील बागायतदारांनी आपल्या बागांचे ट्रेसिबीलीटीनेटद्वारे नोंदणी करून घ्यावी ; कृषि विभागाचे आवाहन

 

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या अर्थसहाय्याद्वारे फळे व भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. यामध्ये विशेष फळपिकांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष, आंबा, संत्री व विविध भाजीपाला पिकांचा समावेश आहे. आंब्याकरीता मॅगानेट, डाळिंबाकरीता अनारनेट, भाजीपाला पिकाकरीता व्हेजनेट व संत्रा, मोसंबी, लिंबू या पिकांचे ऑनलाईन नोंदणीकरीता सिट्रसनेट अशा सुविधा अपेडा साईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

 

जळगाव जिल्ह्यातून मागील वर्षी भेंडीची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली होती. यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्र व्हेजनेट कार्यप्रणालीमध्ये शेतकऱ्यांना समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांना भेंडी मोठ्या प्रमाणात निर्यात करणे सहज शक्य झाले. याचधर्तीवर यावर्षी मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम भाजीपाला निर्यात करण्याचे उदिष्ठ कृषि विभागाने ठेवले आहे. फळ व भाजीपाला निर्यात करण्यासाठी ॲपेडाच्या प्रणालीद्वारे बागेची नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी केल्यानंतर गुणवत्तापुर्वक उत्पादन, किडरोग नियंत्रणासाठी लेबल क्लेम औषधाचा वापर, बागेचा रेकॉर्ड ठेपवणे, किडरोग क्षेत्र इत्यादिंबाबतचे मार्गदर्शन प्रशिक्षाणाद्वारे करण्यात येईल.

 

ऑनलाईन पध्दतीने ट्रेसीबीलीटीनेटद्वारे फळ आणि भाजीपालानिहाय नोंदणीचा कालावधी हा अशाप्रकारे आहे. ग्रेपनेट-नोव्हेंबर-2020 ते जानेवारी 2021, मॅगानेट-डिसेंबर 2020 ते मार्च 2021, अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट आणि बिलावाईननेट यांची नोंदणी वर्षभर नियमितपणे सुरू असते. तरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी या कार्यप्रणालीचा लाभ घ्यावा .असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version