Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 26 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण- डॉ. पाटील

 

जळगाव, , प्रतिनिधी । ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 532 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील 6 लाख 50 हजार 602 घरांना भेट देवून 29 लाख 21 हजार 401 नागरिकांची 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत तपासणी करणार आहे.

आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 पेक्षा अधिक घरांना भेटी देत आहेत. या घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करीत आहे. आवश्यकता भासल्यास या व्यक्तींची कोविड 19 ची चाचणी करून पुढील उपचार केले जात आहेत.

जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 5 लाख 87 हजार 123 कुटूंबांना भेट दिली असून या कुटूंबातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 76 हजार 514 जुन्या विकारांचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, हद्यविकार, कर्करोग, मधुमेह, अस्थमा, किडनी विकार, क्षयरोग, लठ्ठपणासह इतर आजारांचाही समावेश आहेत. तर सारी व सर्दी, खोकला, तापचे 6 हजार 808 रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 910 कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना यश आले आहे. या रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांनी सांगितले.

नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Exit mobile version