Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याचा सन २०२१-२०२२ या वर्षाचा ८७०८.७० कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचा सन २०२१- २०२२ या वर्षाचा ८७०८.७० कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपूरक क्षेत्रासाठी ५०१७.१७ कोटी रुपये सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांसाठी ३०८२.७५ कोटी रुपये आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी ६०८.७८ कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.

यासोबत शेतीसह शेतीपूरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पीक कर्जासाठी ३३४३.९० कोटी रुपये, सिंचनासाठी १८२.६३ कोटी रुपये, शेती यांत्रिकीकरणासाठी १५०.६३ रुपये, पशुपालन (दुग्ध) २६५.४० कोटी रुपये, कुक्कुटपालन १६३.३० कोटी रुपये, शेळी-मेंढीपालन २२८ कोटी रुपये, गोदाम- शीतगृहांसाठी ७८.५६ कोटी रुपये, भूविकास, जमीन सुधारणा ८२.६८ कोटी रुपये, शेती माल प्रक्रिया उद्योगांसाठी १८८.३७ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज ४२२.२० कोटी रुपये, शैक्षणिक कर्ज ३१.८८ कोटी इतका वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच महिला बचत गटासाठी १०७.६८ कोटी रकमेचा विशेष वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे.

याप्रसंगी नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक प्रवीण सिंदकर, अग्रणी बँकेचे प्रबंधक अरुण प्रकाश, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख बँकांचे क्षेत्रीय प्रबंधक, समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version