Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा शासकीय रुग्णालयात आजपासून नॉन कोवीड रूग्णांच्या सेवेला सुरूवात (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांनंतर नॉन कोविड रूग्णांसाठी आज १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सेवा पूर्ववत करण्यात आली. गुलाबराव देवकर महाविद्यालयातील अपघात विभागही शासकीय रुग्णालयात वर्ग करण्यात आला आहे.

सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी निंभोरा ता. रावेर येथील रत्‍नाबाई एकनाथ भिल (वय ४०) यांना पहिला केसपेपर देऊन “ओपीडी” सुरू केली. यावेळी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर.यु. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

जिल्हा शासकीय रुग्णालयात केसपेपरसाठी चार टेबल ठेवण्यात आले. रुग्णाचा केसपेपर काढल्यानंतर समोरील बाजूस वैद्यकीय सेवेसाठी पाठविण्यात येत होते. उपचार मिळाल्यानंतर रुग्ण लवकर घरी जाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. केसपेपर काढण्याची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० वाजेपर्यंत असून रुग्णालयात सकाळी ९ ते १ पर्यंत वैद्यकीय सेवा राहणार आहे. रुग्णांना मदतीसाठी जनसंपर्क कक्ष तयार करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरील इमारतीत अपघात, दुखापती, जळीत, सर्दी, खोकला, ताप, डोळे तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर नाक, कान, घसा, गर्भवती महिलांवर उपचार, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, बालरोग, दंतचिकित्सा, किडनी आजार, प्राण्यांचा चावा, लहान शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंग्यू, फुप्फुस, मणका, सांध्यांचे आजार, मूळव्याध आदी उपचार रुग्णांना मिळणार आहेत. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी रुग्णांनी रेशन व आधारकार्ड सोबत घेऊन येण्याचे आवाहन अधिष्ठातांनी केले आहे.

Exit mobile version