Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा वार्षिक योजनेचा ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर

 

 

 

 

जळगाव  : प्रतिनिधी । आगामी आर्थिक वर्षाच्या  जिल्हा वार्षिक योजनेत ३०० कोटी ७२ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर होता. यात  आणखी १०० कोटी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  वाढवल्याने जिल्ह्याला ४०० कोटी रुपये मिळणार आहे, अशी माहिती  पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली

 

जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या  बैठकीस जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रजंना पाटील, वित्त व नियोजन विभागचे अपर सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपसचिव विजेसिंग वसावे, विशेष कार्य अधिकारी एस.एल.पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्यासह विविध यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

जळगाव जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेत  कार्यान्वयीन यंत्रणांनी ५२८ . ४४ कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार १०० कोटी रुपयांची जादाची मागणी  मंजूर करण्याची  विनंती पालकमंत्र्यांनी बैठकीत केली.

 

जळगाव जिल्ह्यातील सुविधांसाठी १०० कोटी रुपये जादा निधीच्या मागणीस उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिली. यावेळी श्री. पवार म्हणाले, की जिल्हा वार्षिक योजनेतून खर्च न होणारा निधी नगरपालिका व नगरपरिषदांना उपलबध् करुन द्यावा. या निधीतून नागरी भागात सुविधांचे जाळे निर्माण करावे .

 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, नगरविकास, रस्ते विकास, वने, क्रीडा  इत्यादी योजनांसाठी प्राथम्याने अतिरिक्त १०० कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले होते.

 

कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी  पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली होती. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून  पुढील वर्षी शाळांना तसेच पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. पोलिस विभागास चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात येत, असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी  सांगितले.

 

जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी I PASS  या संगणकीय प्रणालीवर वितरीत करण्यात येत असल्याचे पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले. याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी पालकमंत्री पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व नियोजन विभागाचेही कौतुक केले.

 

जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की कोरोना विषाणूच्या काळात जिल्ह्यातील  रुग्णालयांमध्ये ३०० पेक्षा अधिक आयसीयू बेड व १२०० ऑक्सिजन युक्त बेड तयार करण्यात आले ऑक्सिजन टँकचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुपर स्पेशालिटी  सुविधा उपलब्ध झाल्या आहेत,

 

जिल्हा वार्षिक योजनेची नाशिक विभागात प्रभावी आणि सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्याला ५० कोटी रुपयांचा चॅलेंज निधी मिळणार आहे. या निधीसाठी विभागातून एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी I PASS यंत्रणेचा संपूर्ण वापर, जिल्हा नियोजन समितीच्या नियमित बैठका,  जिल्हा वार्षिक योजनेचा पूर्ण निधीचा विनियोग करणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नावीण्यपूर्ण निधीचा विनियोग करणे, कार्यकारी आणि उपसमितीचे गठण करणे आवश्यक राहील.

 

जिल्हा वार्षिक योजनेत राष्ट्रीय जल योजनेचा समावेश नाही. विशेष बाब म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सर्वेक्षणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी  मंजूर करण्यात यावा. शेत पाणंद रस्ते अभिसरणाच्या माध्यमातून चांगली कामे करावीत, सर्व प्राथमिक शाळा, अंगणवाड्या इमारतींना संरक्षक भिंत बांधण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

 

Exit mobile version