Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा रूग्णालयात आदिवासी मजूर महिलेला मृत्यूच्या दाढेतून परतवले

जळगाव प्रतिनिधी । पहूर परिसरातील मजुरी करणाऱ्या आदिवासी महिलेची प्रकृती वेळेवर निदान व उपचार न झाल्यामुळे अत्यंत खालावली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेत उपचारार्थ दाखल केले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम करून महिलेचे प्राण वाचवून महिलेला मृत्यूच्या दाढेतून परतवले.

जामनेर तालुक्यातील जांभूळगाव येथील २४ वर्षीय विवाहितेला २ मुले आहेत. कुटुंब मजुरी करते. त्यावरच उदरनिर्वाह करतात. पहूर व जामनेर येथे उपचार न झाल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बऱ्याच दिवसांपासून महिलेच्या पोटात दुखत होते. सोनोग्राफीत देखील काही निदान होत नव्हते. अखेर ३० डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाल्यावर स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी तपासले. महिलेच्या अंगात रक्त कमी होते. पोटात रक्त जमा झाले होते. तसेच गर्भनलिकेत गर्भ राहून फुटल्याचे निदान त्यांनी केले. त्यामुळे महिला गंभीर झाली होती. सीटी स्कॅन करण्यामध्ये वेळ न घालवता डॉ.बनसोडे हे स्वतच्या निर्णयावर खंबीर राहिले व त्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यांनीशस्त्रक्रिया करून जमा झालेले सुमारे दीड लिटर रक्त बाहेर काढण्यात आले. फुटलेला गर्भ व गर्भ नलिका शस्त्रक्रियेने काढण्यात आले.तसेच कुटुंब नियोजनाची ही शस्त्रक्रिया करण्यात आली.त्यामुळे भविष्यात असा प्रसंग परत येणार नाही. ३ रक्त पिशव्या देण्यात आल्या. अखेर महिलेची स्थिती आता पूर्वपदावर आली असून त्यांना आज गुरुवारी ७ जानेवारी रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. संजय बनसोडे यांना डॉ. अश्विनी घैसास,डॉ.प्रदीप पुंड,डॉ.शीतल ताटे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, अधीपरिचारिका नीला जोशी यांनी सहकार्य केले.

“शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महिलांचे विकारावर तज्ज्ञ डॉक्टर टीमकडून तपासणी होते. गंभीर रुग्ण असेल तर त्यांचे प्राण वाचविण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला जातो. मजूर असलेल्या महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल डॉ. बनसोडे आणि त्यांच्या पथकाचे महाविद्यालय व प्रशासन कौतुक करीत आहे.”
                                                                                         – डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता.

Exit mobile version