Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा रूग्णालयाच्या आवारात अग्निशमन विभागाचे “मॉकड्रील” (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आग लागल्यानंतर करायच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) गुरुवारी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका यांनी सक्रिय सहभाग घेत आग विझविण्याचे धडे गिरविले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आदेशान्वये हे मॉकड्रील करण्यात आले. यासाठी जळगाव महानगरपालिकाच्या अग्निशमन विभागाने सहकार्य केले. विभागाच्या ताफ्यात नुकतीच ४ वाहने दाखल झाली असून त्यातील एका वाहनाचे महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते नारळ फोडून उदघाटन करण्यात आले. या वाहनाचा पहिला प्रयोग जिल्हा रुग्णालयात झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.

यावेळी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, फायरमन अश्वजीत घरडे, भारत बारी यांनी उपस्थित यंत्रणेला आग प्रतिबंधनाची सविस्तर माहिती दिली. प्रसंगी, आग कशी लागते, त्याचे प्रकार किती तसेच आग विझविण्याच्या पद्धती सांगितल्या. आग लागल्यानंतर आग विझविण्याचे उपकरण कसे वापरावे त्याची माहिती दिली. या उपकरणाचा वापर फर्स्ट एड सारखा होतो. आग कुठे लागली हे शोधणे, त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देणे व विझविण्याचा प्रयत्न करणे हे प्राथमिक उपाय करता येतात. यावेळी एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागल्यावर काय करावे त्याबाबत देखील माहिती देत महिला परिचारिकांकडून अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करून घेतले.

यावेळी उपस्थित डॉक्टर, परिचारिका, अधिकारी यांनी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आग प्रतिबंधक टिप्स जाणून घेतल्या. विद्युत पॅनल बोर्डला आग लागली तर पाणी मारणे टाळा. झाडू मारल्याने आग विझू शकते. सिलेंडर भोवती चादर ओली करून कसे गुंडाळावे हे देखील अग्निशमन अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या गेट क्र. २ कडील अद्ययावत वाहन पार्किंगचे कौतुक केले. फायर बिग्रेडच्या वाहनाला येण्यासाठी रस्ता मोकळा हवा, त्यासाठी अद्ययावत असलेल्या पार्किंगचे महत्व त्यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन विभागाचे सहाय्यक फायरमन तेजस जोशी, प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, प्रदीप धनगर, नितीन बारी यांनी उपस्थिती देऊन सहकार्य केले. यावेळी डॉक्टर्स, विद्यार्थी परिचारिका, अधिकारी, कक्षसेवक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

Exit mobile version