Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा रुग्णालयातील शिस्त, नियोजन पाहून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील प्रभावित

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा परिसर अत्यंत चांगल्या प्रकारे सुशोभित झाला असून शिस्त आणि नियोजन उत्तम दिसून येत आहे. यामुळे रुग्णांना “सिव्हिल” आपलेसे वाटत असल्याने आनंद होत आहे. जिल्हयातील विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी यावे असे आवाहनवजा प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

“ड्राय रन” कार्यक्रमावेळी पालकमंत्री पाटील हे भेटीसाठी आले असता त्यांनी महाविद्यालय व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अधिष्ठाता दालन, निर्जंतुकीकरण मशीन तसेच रुग्णालय आवारातील जनसंपर्क कक्ष, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्यालय, केसपेपर विभाग प्रत्यक्ष पाहिला. त्याबाबत कौतुक केले. परिसरात झालेली रंगरंगोटी आणि भित्तिचित्रांमधील रंगसंगती पाहून पाहून पालकमंत्री हरखून गेले. चित्रांमधील बोलकेपणा आणि मेहनत पाहिल्यानंतर त्यांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद आणि प्रशासनाचे कौतुक केले. याठिकाणी विविध व्याधींवर उपचार घेण्यासाठी रुग्णांनी आनंदाने यावे, असे आवाहन करीत “रुग्णालयात उत्तम बदल करीत सुधारणा झाल्या” अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

यानंतर अधिष्ठाता दालनात येऊन पालकमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी, रुग्णालय व महाविद्यालयातील नियोजनाची माहिती देत परिसरातील विविध प्रश्न मांडले. त्यात रुग्णालयात येणाऱ्यांसाठी सुलभ प्रसाधनगृह व शौचालय बांधणे, जनरेटर सुविधा व वाहनतळ सपाटीकरणासह अद्ययावत करून देण्याबाबत पालकमंत्र्यांनी होकार दर्शविला असून प्रस्ताव द्या, लगेच निधी उपलब्ध करून देतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील १५ दिवसात सुलभ प्रसाधनगृह व शौचालय बांधण्याचे, जनरेटर उपलब्धता व वाहनतळ अद्ययावतीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे.

पालकमंत्री पाटील यांना अधिष्ठाता रामानंद यांनी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे रुग्णालयातील सर्व विभाग व परिसर दाखविला. विविध रुग्णकक्षात रुग्णसेवा करीत असलेले डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी, चोहोबाजूला उपस्थित सुरक्षारक्षक, शिस्तबद्ध वाहनतळ, ओपीडी कक्ष, कोरोना कक्ष, स्त्रीरोग व प्रसूती कक्ष, दुसऱ्या मजल्यावरील स्त्री व पुरुषांचे उपचार कक्ष पाहून पालकमंत्री सुखावले. त्यांनी आरोग्ययंत्रणेचे कौतुक केले. आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमचे मनोबल निश्चितच वाढणार आहे. पुढील काळात देखील निश्चितच आणखी चांगली रुग्णसेवा देण्यावर आमचा भर राहील असे यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.

Exit mobile version