Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा प्रशासनातर्फे ‘अर्सेनिक अल्बम-३०’ होमिओपॅथी औषधाच्या ६ लाख ४६ हजार बॉटल्सची निर्मिती पूर्ण

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपॅथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे श्रमदानातून, दानशूर व्यक्तींचे योगदानातून आणि रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने जिल्ह्यातील जवळपास 45 लाख लोकसंख्येस म्हणजेच अंदाजे 11 लाख 50 हजार कुटुंबांना मोफत वाटपासाठी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाच्या आतापर्यंत 6 लाख 46 हजार बॉटल्सची निर्मिती पूर्ण झाली असून त्याचे वाटपही सहा तालुक्यात सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव तथा इंन्सिडंट कमांडर प्रतिबंधात्मक उपाययोजना गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या जवळपास 75 ते 80 टक्के रुग्णांना अत्यंत सौम्य किंवा कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे ते सहज या आजारावर मात करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जे विविध उपाय सुचविलेले आहेत. त्यामध्ये अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचा समावेश आहे. या औषधाची अचानक मागणी वाढल्यामुळे व पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळे औषधाच्या एका बॉटल्सची किंमत 15 रुपयापासून 50 रुपयापर्यत वेगवेगळ्या मेडीकल स्टोअर्समध्ये आकारली जात होती.

कोरोनाच्या या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपॅथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे श्रमदानातून, दानशूर व्यक्तींचे योगदानातून रेडक्रॉस संस्थेच्या सहकार्याने आतापर्यंत 6 लाख 46 हजार बॉटल्स औषधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही औषधे कंटेन्मेंट झोन, झोपडपट्टी भागात, दाटीवाटीचा परिसर, कोव्हीड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर, कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करणा-या अधिकारी, कर्मचारी यांना तसेच भुसावळ, पारोळा, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल तालुक्यातील 100 टक्के नागरीकांना मोफत वाटप सुरु आहे. तर उर्वरित तालुक्यामध्ये येत्या 7 दिवसांमध्ये वाटप पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 45 लाख लोकसंख्येस म्हणजेच अंदाजे 11 लाख 50 हजार कुटुंबांना अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचेमार्फत घरोघरी जावून वाटप करण्यात येत आहे. औषध कसे घ्यावे यासंदर्भाने माहितीपत्रकही सोबत वाटप करण्यात येत आहे. औषध वाटपाचे नियोजन उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांचेमार्फत रेडक्रॉस या संस्थेमार्फत औषध तयार करण्यासाठी लागणा-या साहित्याची खरेदी, देणगीचा हिशोब, भोजन, चहा पाण्याची व्यवस्था व इतर व्यवस्था करण्यात येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे श्रमदानामुळे औषधी निर्मितीचा खर्च अत्यंत कमी म्हणजे सर्वसाधारणपणे 1 रुपया 5 पैसे प्रति कुटूंब येत आहे. असे अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव तथा इंन्सिडंट कमांडर प्रतिबंधात्मक उपाययोजना गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version