Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा क्रीडा संकुल अद्ययावत करणार : ना. गिरीश महाजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा संकुलास अद्ययावत करण्यासह राज्यातील क्रीडा प्रशिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले. ते जळगावात आयोजित दुसर्‍या राज्यस्तरीय पंच रेफ्री सेमिनारमध्ये बोलत होते.

जळगावात आज शनिवार, दि. १ ऑक्टोबर रोजी दुसरे राज्यस्तरीय पंच रेफ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, विनायक गायकवाड; तायक्वांडो फेडरेशनचे उपाध्यक्ष मिलिंद पाठरे, सचिव प्रवीण बोरसे, व्यंकटेश कररा, सुभाष पाटील, झुलीचंद मेश्राम, आयोजक अजित गाडगे व सौरभ चौबे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या सेमिनारमध्ये विविध खेळांचे पंच तसेच रेफ्रींना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ना. महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला उर्जीतावस्था आणण्यासाठी व्यापक उपाययोजनांची आवश्यकता असून याबाबत तात्काळ कार्यवाहीस प्रारंभ करण्यात आला आहे. यातील महत्वाचा घटक असणार्‍या तालुका पातळीवर क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आली असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

क्रीडा विकासात प्रशिक्षकांचा सर्वात मोठा आणि महत्वाचा वाटा असतो. राज्याला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर करायचे असेल तर तालुका पातळीवर पायाभूत सुविधांच्या उभारणीसोबतच प्रशिक्षकांचे जाळे देखील उभारावे लागणार आहे. यासाठी राज्याच्या क्रीडा विभागातर्फे प्रशिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यास आम्ही प्रारंभ केला आहे. यात प्रामुख्याने त्यांचा डीए वाढविण्यात आला असून अन्य मागण्यांवर देखील विचार करण्यात आला आहे.

ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले की, जामनेर येथे बालेवाडीच्या धर्तीवर अतिशय अद्ययावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येत असून याचे काम मार्गी लागले आहे. तर जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधा प्रदान करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असून याबाबत लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याची ग्वाही देखील गिरीश महाजन यांनी याप्रसंगी दिली.

Exit mobile version