Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची स्थापना; पालकमंत्र्यांचा पुढाकार

जळगाव प्रतिनिधी । साथीचे रोग तसेच अन्य तत्सम विकारांना आळा बसण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि शासकीय आरोग्य यंत्रण व जनतेत समन्वय साधण्यासाठी जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली ही समिती अशा स्वरूपाची राज्यातील पहिली समिती ठरली आहे.

सव्वा चार वर्षात एकही समिती नाही

याबाबत वृत्त असे की, राज्य शासनाने सार्वजनीक आरोग्य विभागासाठी २३ डिसेंबर २०१५ रोजी जीआर काढून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सेवा समन्वय समिती स्थापित करण्यात यावी अशी निर्देश दिले होते. याच्या अंतर्गत वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया किंवा साथीचे रोग व तत्सम
संसर्गजन्य रोगांवर (कोविड-१९ सारखे) आळा बसविण्यासाठी, तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावी व किफायतीर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय आरोग्य सेवा संस्था व खासगी दवाखाने यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा आरोग्य समन्वय समितीची स्थापना करण्यात यावी असे सुचविण्यात आले होते. हा शासन निर्णय होऊन सव्वा चार वर्षे झाली तरी अद्याप राज्यात कुठेही ही समिती स्थापन करण्यात आली नव्हती. यातच सध्या कोवीड-१९ विषाणूमुळे उडालेला हाहाकार पाहता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा आरोग्य समन्वय समितीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी ३० मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांना याबाबतचे निर्देश दिलेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधीत समितीला गठीत करण्याची घोषणा केली आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.

लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा समावेश

जिल्हा समन्वय समितीचे पदसिध्द अध्यक्ष पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आहेत. या समितीच्या पदसिध्द उपाध्यक्षा जि.प. अध्यक्षा सौ. रंजना पाटील व जळगावच्या महापौर भारती सोनवणे या आहेत. तर सदस्यांमध्ये खासदार उन्मेष पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लताताई सोनवणे व आमदार शिरीष चौधरी यांचा समावेश आहे. पदसिध्द सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जि.प. सीईओ डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मराविम अभियंता श्री शेख; सा.बां. खाते उपअभियंता प्रशांत सोनवणे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक डॉ. म.रे. पट्टनशेट्टी; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोतोडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पवन पाटील व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचा समावेश असणार आहे.

नामवंत डॉक्टर्स व हॉस्पीटलचा समावेश

या समितीत खासगी क्षेत्रातील दहा नामवंत डॉक्टर्सचा समावेश आहे. यामध्ये डॉ. निलेश चांडक, डॉ. शीतल ओस्तवाल, डॉ. दीपक पाटील, डॉ. परिक्षीत बाविस्कर, डॉ. प्रताप जाधव, डॉ. स्नेहल फेगडे ( सर्व जळगाव); डॉ. तुषार पाटील, डॉ. वैजनाथ चौधरी, डॉ. सारिका संजय पाटील, डॉ. नयन महाजन ( सर्व भुसावळ) यांचा समावेश आहे. या समितीत सार्वजनीक आरोग्य क्षेत्रातील दोन अशासकीय संस्थांमध्ये पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉ. भूषण मगर आणि मेडिसीन डिलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचा समावेश आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे नामनिर्देशीत मुकुंद गोसावी आणि पवन प्रकाश जैन यांनादेखील या समितीत सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.

समितीची कामे

जिल्हा आरोग्य सन्वय समिती अतिशय महत्वाची असून याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांचा आढावा घेऊन आढळलेल्या त्रुटींचे निराकरणाच्या उपाययोजना सुचविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरांसह जनजागृती मोहिमा राबविण्यासाठी ही समिती कार्यरत राहील. नियोजन समितीने मंजूर केलेल्या आरोग्य विषयक निधीतील खर्चाचा आढावा ही समिती घेणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये समन्वय साधण्याचे काम ही समिती करणार आहे. साथीच्या रोगाच्या प्रादूर्भावाच्या प्रसंगी प्रतिबंधक उपाय, रोगनिदान, चिकित्सा आदी उपाय करणे; राजीव गांधी जीवनदायी योजनाच्या अंमलबजावणीची पाहणी करणे तसेच आरोग्य संस्थांसाठी दुरूस्ती, पाणी पुरवठा आदींसाधी निधी उपलब्ध करण्याचे काम ही समिती करणार आहे.

पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन

जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या विविध विभागांमध्ये समन्वयाची महत्वाची जबाबदारी पार पाडली जाणार असून याचा नागरिकांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या समितीतील सर्व नवनियुक्त सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. या समितीची जळगावला लवकरच पहिली बैठक घेऊन कार्याची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version