Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना तपासणी प्रयोगशाळेचा आढावा

 

जळगाव : प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शनिवारी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोना विषाणू नमुने तपासणी कामाचा आढावा घेतला. विविध त्रुटयांवर संबंधितांशी चर्चाही केली

 

 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नरत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागात  विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे. ही प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावत असून २४ तास नमुने तपासणी करून लवकर निदान व्हावे यासाठी अहोरात्र झटत आहे. १ लाख ७५ हजाराच्यावर कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या आजवर पोहोचली आहे.

 

जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रयोगशाळेचा आढावा घेतला. यावेळी जि प  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रलंबित नमुन्यांच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. अडचणी समजून घेत त्यावर विविध सूचना करण्यात आल्या.

 

प्रयोगशाळेतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत  व त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. काही अहवाल  तांत्रिक कारणास्तव प्रलंबित राहत आहे, या तांत्रिक अडचणी दूर कशा होतील याविषयी जिल्हाधिकारी, सीईओ यांच्यासह प्रमोद बोरोले यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित व डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान पठाण, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. चेतन भंगाळे उपस्थित होते.

 

Exit mobile version